Activities

  • Home
  • »
  • Activities

Christmas Carol Program

संग्राम आयोजित कॅरल सिंगिंग कार्यक्रम

सांगली - मिरज, महाराष्ट्र, १४ - १५ डिसेंबर २०१८ भारतीय राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला त्याच्या व्यक्तिगत धर्माचे किंवा सांस्कृतिक जीवन, आचार, विचार पद्धतीचे आयुष्य निर्भयपणे जगण्याची मुभा दिली आहे. इतकेच नव्हे तर हे निर्भय वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी सरकारवर संविधानाने दिली आहे.

संविधानाने दिलेल्या मानावा धिकाराच्या कक्षेत प्रत्येक धर्मीयाला आपल्या धार्मिक, सांस्कृतिक अभिव्यक्ती व्यक्त करण्याचा पूर्ण हक्क मिळतो. याच मानव अधिकाराच्या चौकटीतून ‘संग्राम’ संस्थेच्या वतीने ख्रिस्ती धर्मीय समाजातील व्यक्तींना घेवून सर्व धर्मीय लोकांसाठी कॅरल सिंगिंग चा कार्यक्रम घेण्यात आला होता.

कॅरल सिंगिंग हि सुद्धा एक वेगळी सांस्कृतिक परंपरा आहे. हि परंपरा जोपासणे, वाढविणे आणि त्याची माहिती इतर धर्मीय समाजापर्यंत पोचावी; हे या कार्यक्रमाचे वेगळेपण आहे. मागच्या वर्षी पासून हा कार्यक्रम संस्थेमार्फत आयोजित केला जातो. गेल्या वर्षी सांगली शहरातील स्टेशन चौक येथे हा कार्यक्रम पहिल्यांदा घेतला. या वर्षी एकाच ठिकाणी न घेता वेग वेगळ्या ठिकाणी घेण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार सांगली व मिरज शहरातील वेग वेगळी ठिकाणे निवडून ज्यास्तीत ज्यास्त लोकांपर्यंत सदरचा कार्यक्रम पोचवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले. या नियोजनासाठी संग्राम , वंप, विद्रोही महिला मंच, नजरिया, मित्रा, सी.बी.एम, मुस्कान, कसम सह प्रमुख कार्यकर्त्यांशी मिटिंग घेण्यात आली. संस्थेच्या कार्यकर्त्यांसह सांगली, मिरज भागातील ख्रिस्ती समाजातील लोकांबरोबरच इतर धर्मीय आणि विशेष करून कार्यक्रम ठिकाणातील सामाजिक दृष्ट्या प्रभावी आणि संग्राम च्या कार्यास पाठिबा दर्शविणाऱ्या पर्यंत पोचून नियोजन करण्यात आले. त्या नुसार प्रत्येक ठिकाणी एक,दोन स्थानिक व्यक्तींची प्रमुख उपस्थिती म्हणून हजर राहण्याच्या दृष्टीने निमंत्रणे देण्यात आली.

ठरलेल्या ठिकाणी त्या विभागातील ख्रिस्ती धर्मगुरू बरोबरच नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक कार्यकर्ते, चर्चशी संबंधित सदस्य, सामाजिक चळवळीशी निगडीत असणारे कार्यकर्तेहि सामील झाले होते. यामध्ये विशेष करून आठ विविध राज्यातून आलेले एन एन एस डब्लू चे कार्यकर्ते देखील सामील झाले होते.

ख्रिसमस ची पारंपारिकता दिसण्यासाठी कॅरल सिंगिंग करणाऱ्या ग्रुप करिता ट्रकची सोय करण्यात आली होती. त्यावर विद्युत रोषणाई केली गेली या ट्रकला आकर्षक रोषणाई केली त्यामध्ये ख्रिसमस ट्रि, फुगे, पताका यांचा वापर केला होता; सोबतीला संग्राम आणि संघटनातील कार्यकर्ते यांनी विशेष प्रकारे सजावटही केली होती. स्वाध्यायन च्या मुलीनी देवदूतची वेशभूषा तर मित्रा संघटनेचा कार्यकर्ता सांताक्लॉज बनून सर्वाना शुभेछया देण्यास सज्ज झाला होता.

दिनांक १४ आणि १५ डिसेंबर या दोन्ही दिवशी हा कार्यक्रम घेण्यात आला. पहिल्या दिवशी कार्यक्रमाची सुरवात क्रांतीसिंह नाना पाटील चौक,विश्रामबाग येथे झाली. या वेळी सांगली जिल्हा कॉंग्रेस शहर कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते. सोबत धर्मगुरू पी बी काळे होते. प्रार्थना करून कार्यक्रम सुरु झाला.

मा.पृथ्वीराज पाटील म्हणाले कि संग्रामने सुरु केलेला हा कार्यक्रम उत्तम असून त्यासाठी माझ्याकडून शुभेछया. हा आनंदाचा आणि संगीताचा कार्यक्रम आहे. गेले २५ वर्षे अविरतपणे काम करत असलेल्या संस्थेच्या कामाबद्दल आदर व्यक्त केला. मला संधी दिली म्हणून आभार मानतो. ख्रिसमस हा आनंदचा दिवस आहे. त्या अनुषंगाने आयोजित सर्व कार्यक्रमाना आम्ही सर्व ख्रिस्ती बांधवाना शुभेछया देतो. संग्राम ने अधिक एक आठवडा आनंदाचा घातला त्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर जी. टी. सी. कॉयर ग्रुप, मिरजने ख्रिसमसची गीते सादर केली.

पुष्पराज चौक मध्ये सदरच्या कार्यक्रमासाठी मा. के डी शिंदे,जनता दल,सांगली आणि मा. अमित शिंदे, अध्यक्ष, सांगली जिल्हा सुधार समिती यांनी स्वागत आणि आपले विचार मांडले. ते म्हणाले कि येशूचा जन्मदिवस आपण साजरा करत आहोत. संविधानाने सर्वाना धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. आपला देश सर्व धर्मियांचा आहे. हे धर्म ज्या ज्या देवतांवर आहे, त्या देवतांचे पुण्य स्मरण करणे व सर्व धर्मियांना आपापल्या धर्मानुसार जन्मदिवस हि साजरा करता येतो. त्यानुसार येशूच्या जन्मदिना निमित्त आजचा कार्यक्रम आहे. ह्या देशात आपण सर्व एक आहोत. सर्व जाती धर्माचे लोक एक आहोत. येशूने ज्या प्रकारे सांगितले कि करूणा आहे, शांती आहे, नैतिकता आहे, ह्या सर्व गोष्टी पाळण्यासाठी आपण जमलो आहोत, हा कार्यक्रम आयोजित केला म्हणून आनंद वाटतो. मा. अमित शिंदे म्हणाले कि मागच्या वर्षी पेक्ष्या ह्या वर्षी कार्यक्रमाची व्याप्ती वाढली आहे ती अशीच वाढावी हि अपेक्षा.

मिशन कम्पौंड मध्ये स्थानिक ख्रिस्ती समाजातील सर्वजण एकत्रित येवून ट्रकचे स्वागत केले आणि आपले मनोगत मांडले. या वेळी स्थानिक चर्चचे महिला मंडळ, तरुण मंडळ आणि जेष्ठ नागरिक उपस्थित होते. मा.डी.ए.काळे यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रम आयोजित केला आम्हा सर्वाना आज अगदीच आगळे वेगळे दिसते आहे.एक नवीन अनुभव येत आहे असे म्हणून कार्यवाह मीना सेशु आणि संग्राम संस्थेच्या कामाबद्दल आभार मानले. मला सर्वाचे वारंवार अभिनंदन करावेसे वाटत आहे असे ते म्हणाले. सुरुवातीला येशू जन्म दिवसाची माहिती देवून जगभरात ख्रिसमस आनंदाचा दिवस म्हणून साजरा केला जातो असे सांगितले. स्थानिक महिला मंडळातील सुषमा ननदिकर या म्हणाल्या कि आज विशेष आभार मानतो कि संग्राम संस्थेने आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संग्राम चे संचालक आणि मीना सेशु यांनी देशातील विविधेतेमध्ये एकता आहे याचे प्रतिक म्हणून कार्यक्रम केला म्हणून आभार. सामाजिक बांधिलकीला पुढे नेण्याचे हे काम आहे.

लीना सावर्डेकर म्हणाल्या कि ख्रिस्ती धर्मियांना असलेले धार्मिक स्वातंत्र्य टिकवण्याच्या दृष्टीने सुरु केलेला कार्यक्रम आमच्यासाठी महत्वाचा आहे. सुवार्ता सांगण्यासाठी जमलेल्या सर्वाचे त्यांनी कौतुक केले. आणि सर्व सहभागींचे आभार मानले.

मागरेट देवकुळे म्हणाल्या कि आज हा दिवस आपल्यासाठी फार मोठा आनंदाचा आहे. आमच्या आनंदोस्तावामध्ये संग्रामच्या सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आणि आयोजन केले याबद्दल खूप खूप आभार विशेष करून मीना सेशु यांचे आभार मानते.

कॉंग्रेस भवन येथील कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून मा. जयश्री मदन पाटील,जेष्ठ कार्यकर्त्या महिला कॉंग्रेस आणि माजी नगरसेविका मा. ज्योती आदाटे हजर होत्या. त्या म्हणाल्या कि मला असे समजले होते कि मागे गेल्या काही वर्ष्यापूर्वी असा कार्यक्रम करताना काहींनी प्रतिबंध केला होता त्यास सांगू इच्छीते कि हा आमचा देश आहे. आणि संविधानाने अधिकार दिलेले आहेत. कुणीही त्यावर प्रतिबंध घालता कामा नये ; हे आपले घर आहे. आपली माणसे आहेत म्हणूस सर्वांनी एकोप्याने राहिले पाहिजे. आम्ही सर्व धर्मांचे पालन आणि आदर करणार.

मा. जयश्री पाटील यांनी संग्राम ने सुरु केलेल्या उपक्रमास शुभेछया दिल्या. आपल्या देशात सर्व धर्मातील लोक एकोप्याने राहतात. धर्माच्या शिकवणी प्रमाणे सर्वांनी प्रेमाने जग जिंकावे.

स्टेशन चौक मध्ये मा.पी.बी काळे यांनी प्रास्ताविक केले आणि त्यानंतर कॉयर ग्रुपने गीते सादर केली गेली.

दुसऱ्या दिवशी कार्यकमाची सुरुवात मिरज येथील गांधी चौक येथे झाली. सदरच्या कार्यक्रमास स्थानिक मिरज चर्च चे धर्मगुरू मा. एम एम वाघमारे आणि राष्ट्र सेवा दलाचे मा. सदाशिव मगदूम हे प्रमुख उपस्थित होते. मा.वाघमारे म्हणाले कि मिरज मध्ये हा कार्यक्रम आयोजित केला त्या बद्दल स्वागत आणि संग्राम ने सर्व धर्माचा सांस्कृतिक वसा जपण्यासाठी केलेले काम महत्वाचे आहे त्याबद्दल आभार. सर्व समाजातील घटकातील व्यक्ती बरोबर काम करण्याची सेवा महत्वाची आहे.

राष्ट्र सेवा दलाचे मा.मगदूम यांनी सांगितले कि चांगल्या गोष्टीचे आचरण करणे महत्वाचे असते. सतत वाईट गोष्टींचा मारा आपल्यावर होत असतो अश्या परीस्थितीत चांगला माणूस म्हणून जगावे या करीता सतत चांगले विचार मांडावे लागतात. त्या अनुसार आपण वेगवेगळ्या माध्यामातून संस्कार करत असतो. प्रभू येशू आणि बुद्ध यांचे कार्य पाहता ती फक्त माणसे राहिली नाहीत तर कालांतराने ती भगवान झाली.कारण त्यांनी सत्याचा प्रवास समजून घेतला. माणूस म्हणून काय उद्देश असावा याचा त्यांनी अभ्यास केला. माणसाप्रमाणे आजच्या जगात आपण जगत आहोत काय याची जाणीव होण्याकरिता जागृती कार्यासाठी आजचा कार्यक्रम महत्वाचा आहे. समता येण्याचा प्रयत्न करूया. आपले सुख आपण एकमेकास वाटूया.

मिरज येथील शास्त्री चौक येथे प्रमुख उपस्थिती म्हणून मा. संगीता हारगे, नगरसेविका, सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका यांच्या बरोबर वेश्या अन्याय मुक्ती परिषदेच्या सामाजिक कार्यकर्त्या, मा. मिनाक्षी कांबळे हजर होत्या. मा. संगीता हारगे म्हणाल्या या कार्यक्रमाचा उद्देश फक्त संग्रामचा नाही तर सर्वांचा आहे. माणुसकी धर्म जपणे गरजेचे आहे. संविधानाने दिलेला अधिकार जपण्याकरिता आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. मानव धर्माचा संदेश सर्वापर्यंत पोचवूया. मा.मीनाक्षी कांबळे म्हणाल्या कि आम्ही संग्राम संस्थेचे स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमातून सर्वापर्यंत शांततेचा संदेश देण्याचे काम आम्ही सर्वजन करत आहोत.

कर्मवीर चौक मिरज येथील कॅरल सिंगिंग साठी ग्रेस मेसेंजर ग्रुप सहभागी झाला होता. त्यांनी गीते सदर केली. या कार्यक्रमा वेळी मा. रवींद्र फडके सर यांची विशेष उपस्थिती लाभली. ते म्हणाले कि मानवता वाद वाढवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. माझी निवड केली कारण - मी स्वताला कधी ब्राम्हण समजलो नाही, कधीही जान्हवे घातले नाही. मी स्वताला पहिल्यांदा माणूस समजतो. मी नमाज पढू शकतो. मी रोजा पण ठेवतो. रमजान मध्ये मी रोजा करतो. ख्रिसमसच्या वेळेस कॅरल सिंगिंग मध्ये सहभागी होतो. हिंदूंचे सण असो, दुर्गा अष्टमी असो,नवरात्र असो ; सगळे आणि सगळ्यांचे सण माझे आहेत. हिंदू पण मीच आहे. मुस्लीम पण मीच आहे. ख्रिस्ती पण मीच आहे. सर्व जातीचा मीच आहे. आणि मी भारतीय आहे. आपण सगळे जण एक होवुया.सगळ्या जातीपाती विसरून जावूया. फडके सर यांच्या विचार मांडणी नंतर ग्रेस मेसेंजर ग्रुप ने ख्रिसमस ची गीते सादर केली आणि संग्राम आयोजित कॅरल सिंगिंग कार्यक्रमाचा सांगता समारोप झाला.